। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यात अपघाताची मालिका सुरूच आहे. तालुक्यातील जासई येथील उड्डाण पुलावर शुक्रवारी (दि.10) सायंकाळच्या सुमारास एका मोटारसायकल डंफरमध्ये अपघात घडला. या अपघातात मोटारसायकलवरील तिघेजण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्यांपैकी आयान गफान नेरकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उरण तालुक्यातील जासई उड्डाण पुलावर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास डंपर व मोटारसायकलस्वार यांची जोरदार धडक झाली. या अपघातात मोटारसायकलस्वार आयान गफान नेरकर हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला वाशी येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. तर अपघातात इतर दोन जण जखमी झाले असून त्यांना उलवे नोड येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच उरण वाहतूक पोलीस व वाहतूक पोलीस निरीक्षक अतुल दहिफळे घटनास्थळी तात्काळ हजर झाले असून पुढील तपास उरण पोलीस करीत आहेत.