पाली-खोपोली राज्य महामार्गावरील घटना; रिक्षाचालक गंभीर जखमी
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
वाकण पाली-खोपोली राज्य महामार्गावर पहाटे चार वाजता रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाती दुर्घटनने घोडपापड गावावर शोककळा पसरली आहे.
वाकण पाली-खोपोली राज्य महामार्गावर दुरशेत गावानजीक पहाटे चार वाजता खोपोलीकडून जांभूळपाडा घोडपापडकडे जाणाऱ्या रिक्षाचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला असून यात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. अपघातातील दोन्ही मृत तरुण हे घोडपापड सुधागड येथील रहिवासी असून रामदास ज्ञानेश्वर घोगरकर व अजित हरीचंद्र वाघमारे अशी मृतांची नावे आहेत.
रिक्षाचा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप कोणतेही कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रिक्षाचा चुराडा झाला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे असून पोलिसांनी अपघाताचा योग्य तो तपास करावा, अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.