। माणगाव । सलीम शेख ।
माणगाव-दिघी राज्य मार्गावर माणगावपासून ६ कि.मी. अंतरावर असणाऱ्या बोर्ले गावच्या हद्दीत भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकची धडक लागुन झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. सदर अपघाताचा गुन्हा बुधवार दि.५ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
घटनेतील आरोपी शाहरुख रज्जाक शेख (वय-२७) रा. सातेफल जि. जालना हे त्यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रक क्र. एम.एच.०६बी.डी.६४१५ हि गाडी दिघी ते माणगाव राज्य महामार्गाने श्रीवर्धन बाजूकडून माणगाव बाजूकडे भरधाव वेगात चालवीत घेऊन येत असताना त्यांची गाडी माणगाव जवळ आली असता बोर्ले गावाकडील श्री भैरी बोजारई देवीची पालखी देवीच्या मंदिराकडे वळत असताना आरोपी ट्रक चालक याच्या ताब्यातील ट्रकची समोरून चाललेल्या देवीचे पालखीच्या सोबत असलेल्या फिर्यादी सुनील बाबुराव जेधे (वय-४३) रा. बोर्ले ता. माणगाव यांना धडक बसून या अपघातात ते गंभीररित्या जखमी झाले आहेत.
या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात कॉ. गु. रजि. नं. ९१/२०२३ भादंवि संहिता कलम २७९, ३३७,३३८, मोटार वाहन कायदा कलम अधि नियम १८४ प्रमाणे दाखल करण्यात आली आहे. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. भोजकर हे करीत आहेत.