उभ्या वाहनाचा टायर पंक्चर काढत असताना दुचाकीची धडक
। महाड । वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी 7 वाजता रस्त्याच्याकडेला पंक्चर झालेल्या वाहनाचे टायर बदलत असतानाच महाडकडे येणाऱ्या भरधाव दुचाकीने चार जणांना धडक दिली. या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून चार जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी दूचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावच्याजवळ एका टेम्पोचा टायर पंक्चर झाल्याने टायर बदलण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान महाड दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीने टायर बदलणाऱ्या चौघांना धडक दिली. या अपघातामध्ये यशवंत हरिश्चंद्र महाप्रळकर (65) हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर टेम्पोचा टायर बदलणारे फिराश उमर मुगरूसकर (रा. म्हाप्रळ), शिवम शिवदास साळी (रा. म्हाप्रळ बौद्धवाडी), आकीब अब्दुल मजीद मुगरूसकर (रा. म्हाप्रळ) आणि आरोपी सूरज चंद्रकांत सावंत हे चौघेजण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दुचाकीस्वार सुरज चंद्रकांत सावंत (रा. खैरे महाड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







