महावितरणच्या कर्मचार्यांचा जागीच मृत्यू
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
रत्नागिरी शहराजवळील टीआरपी आदिनाथ नगर रस्त्यावर डंपर आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात महावितरणच्या 2 कर्मचार्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. डंपर चालकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मिर्या-नागपूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे हा भीषण अपघात झाला असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. राघो कृष्णा धुरी (68), मुक्तेश्वर सहदेव ठिक (58) अशी अपघातात मृत पावलेल्या कर्मचार्यांची नावे असून दोघही रत्नागिरीमधील रहिवासी आहेत. हा अपघात शुक्रवारी (दि.25) सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राघो धुरी हे महावितरणचे निवृत्त अधिकारी होते. तर, मुक्तेशवर ठिक हे महावितरण येथे कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी धुरी हे दुचाकीवरून मुक्तेश्वर ठिक यांना सोबत घेऊन मारुती मंदिर मार्गे नाचणेरोडवरील त्यांच्या महावितरण कार्यालयाकडे येत होते. टीआरपी येथे आले असता समोरुन येणार्या एसटीला त्यांनी बाजू दिली. मात्र, रस्त्याच्या कामामुळे खडीवरुन दुचाकीवरील ताबा सुटून दोघही खाली पडले. याचवेळी रस्त्यावर हातखंबाहून येणार्या डंपरचालक नागेश शंकर कट्टेमणी (32) हा वेगाने येत होता. त्याचा डंपरवरील ताबा सुटला आणि डंपर त्या दोघांच्याही डोक्यावरुन गेला. यात या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करुन दोघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे अमलदार करत आहेत.







