सुरक्षेसाठी उभारलेल्या लोखंडी खांबाला धडक
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-रेवदंडा मार्गावरील बेली पुलावर एक भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये टेम्पोमधील तीनजण गंभीर जखमी झाले असून, टेम्पोचे नुकसान झाले. रेवदंड्याकडून अलिबागकडे येत असताना लोखंडी खांबाला धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. यामध्ये त्या लोखंडी खांबाचेही नुकसान झाले आहे. बेली पूल धोकादायक असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले. या पुलावरून अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला होता. तरीदेखील या रस्त्यावरून अवजड वाहने धावत होती.
याबाबत वेगवेगळ्या संस्थांसह सामाजिक संघटनांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्याकडे निवेदन दिले. सावित्री नदीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची जाणीव करून दिली. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले. जड-अवजड वाहनांचा प्रवेश रोखण्यासाठी पुलापासून काही अंतरावर लोखंडी खांब शुक्रवारी (दि.10) सकाळी बसविण्यात आले. मात्र, दुपारी साडेतीननंतर रेवदंड्याकडून अलिबाकडे एक टेम्पो भरधाव वेगात येत होता.
रस्त्याच्या बाजूला उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबाला टेम्पोची जोरदार धडक लागली. हा अपघात इतका भीषण होता, की लोखंडी खांब वाकले. त्यात गाडीचेही नुकसान झाले. या अपघातामध्ये टेम्पोतील तिघेजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
