। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल ते कळंबोली रेल्वे स्थानकादरम्यान डाउन रेल्वे मार्गावर मालगाडीची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या 32 वर्षीय अनोळखी तरुणाचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला पोलिसांनी उपचारासाठी पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाची उंची सुमारे 5 फूट 6 इंच असून, त्याची शरीरयष्टी सडपातळ आहे. त्याने आकाशी रंगाच्या निळ्या व हिरव्या रंगाच्या पट्ट्यांचा फुल बाह्यांचा शर्ट आणि राखाडी रंगाची ट्रॅक पॅन्ट परिधान केली होती. तसेच त्याच्या डाव्या हाताच्या मनगटावर जुन्या जखमेच्या दोन गोलाकार खुणा आहेत. या अनोळखी मृत तरुणाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या तरुणाबाबत किंवा त्याच्या नातेवाईकांबाबत कोणाला काही माहिती असल्यास तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. राऊत मो. 9579501504 किंवा पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण वेदपाठक मो. 9870157850 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.






