। सांगली । वृत्तसंस्था ।
मुंबईत दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाचे जोरदार तयारी झाली आहे. एकीकडे दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असताना, तिकडे सांगलीच्या शिवसैनिकांचा मोठा अपघात झाला. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईला निघालेल्या शिवसैनिकांच्या गाडीला आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चारचाकी (एमएच-10-एजी-4320) वाहनातून कवठे महांकाळ येथून मुंबई येथे होणाऱ्या शिंदे यांच्या शिवसेना दसरा मेळाव्यासाठी निघाले होते. एक भरधाव ट्रकने शिवसैनिकांच्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यातून जाणाऱ्या रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोण गावाजवळी ही घटना घडली.
विवेक सुरेश तेली (42) रा. विद्यानगर कवठेमहांकाळ असे मृत व्यक्तीचे नाव असून महेश शिवाजी सूर्यवंशी (30) रा. कवठे महांकाळ, संदीप शिंत्रे (40), सुभाष कूनुरे (55) दोघे रा. हिंगणगाव ता.कवठे महांकाळ, प्रसाद सूर्यवंशी रा. कवठे महांकाळ अशी जखमींची नावे आहेत आहेत. हे सर्व शिंदे गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी असल्याची माहिती आहे.