सरपंचांच्या पाठपुराव्याला यश
| रसायनी | वार्ताहर |
कोन-सावळे राज्य मार्गावरून जड वाहतूक तसेच हलक्या वाहनांचा वावर अधिकच वाढत आहे. यातच कोन-सावळे रस्ता सिमेंट काँक्रीटचा रस्ता झाल्याने वाहन चालक हे अतिशय वेगामध्ये वाहन चालवत होते. त्यामुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची खंत सरपंच माधुरी अनिल पाटील यांना होती. त्यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागालाही पत्र देऊन नागरिकांचा जीव गेल्यावर गतिरोधक बसणार का, असा सवाल केला होता.
कसळखंड थांब्यावर अनेक लहान-मोठे अपघातही झाले आहेत. अखेर सरपंच माधुरी अनिल पाटील यांनी लक्ष घालून कसळखंड ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून कसळखंड गाव ते थांब्यापर्यंत जाणार्या मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविले. या रस्त्यावर गतिरोधक बसविल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना नियंत्रण ठेवावे लागणार असून, अपघाताची संख्या कमी होणार आहे.