खातेवाटपाचा तिढा वाढला

फडणवीस, अजितदादा नवी दिल्लीत

| मुंबई | प्रतिनिधी |

राज्यातील सत्ताधारी तीन पक्षातील खातेवाटपाचा तिढा अद्यापही न सुटल्याने त्यावर काय तोडगा काढायचा याचीच चिंता आता भाजप नेतृत्वाला लागली आहे. या पार्श्‍वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तातडीने नवी दिल्लीत गेल्याने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. मंगळवारी मध्यरात्री खातेवाटपा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला अजितदादा, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उपस्थित होते. सोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते. या बैठकीत अर्थ सोडून इतर सर्व खाते वाटप निश्‍चित करण्यात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या बैठकीत झालेली चर्चा दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींना कळवली जाईल आणि तिथून होकार आल्यानंतर ताबडतोब खाते वाटप जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे, अशी माहितीही सुत्रांकडून कळते आहे. यामध्ये काही शिवसेनेची आणि काही भाजपची खाती राष्ट्रवादीला देण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याचसाठी फडणवीस दिल्लीकडे रवाना झाले आहेत तर अजितदादा संध्याकाळी सहा नंतर दिल्लीकडे रवाना होतील. पण यामुळं आजच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटप होईल की नाही याबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे.

शिंदे गटावर अन्यायच
आमच्या 40 आमदारांपैकीही इच्छुकांना न्याय मिळालेला नाही. बच्चू कडूंचा गैरसमज होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ज्यावेळी मंत्रीमंडळ विस्तार होईल, तेव्हा एकनाथ शिंदे योग्य तो निर्णय घेतील, असे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. सरकारमध्ये शिंदे गटाला वाईट वागणूक मिळते का? असा प्रश्‍न विचारताच उदय सामंत यांनी ही चर्चा फेटाळून लावली. कोणतीही वाईट वागणूक आम्हाला मिळत नाही. इथे मुख्यमंत्रीच शिवसेनेचे आहेत. आमच्या सर्वांचा एकनाथ शिंदेंवर विश्‍वास आहे. ते योग्य निर्णय घेतील याची मला खात्री आहे, असं उदय सामंत म्हणाले. अर्थखातं कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाहीत. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा पूर्ण विश्‍वास एकनाथ शिंदेंवर आहे. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील, तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने व महाराष्ट्राच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही कुणाला कोणतं खातं द्यावं, याची चर्चाही करत नाही, असं उदय सामंत यांनी नमूद केलं.

Exit mobile version