। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील शिळोशी गावात सात वर्षे तीन महिने वर्षे वयाच्या चिमुरडीवर धमकी देऊन लैंगिक अत्याचार करणार्या आरोपीस पाच वर्षे सश्रम कारावास व दहा हजार दंडाची शिक्षा आणि दंड न भरल्यास 6 महिने सश्रम कारावासाची सोमवारी (दिा.21) विशेष सत्र न्यायाधीश माणगाव यांनी सुनावली आहे.
या संदर्भात सविस्तर माहिती अशी की, 1 एप्रिल 2021 रोजी या अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय हे कामधंद्या करिता बाहेर गेले असता घराच्या ओटीवर ही अल्पवयीन मुलगी खेळत होती. घरात कोणी नाही याचा फायदा घेऊन दुपारी 3 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान या मुलीला शेजारी राहणारा आरोपी मोहन धोंडू शिर्के (वय.45) रा. शिळोशी याने त्याच्या घरामध्ये नेऊन खाऊचे प्रलोभन दाखवून मुलीवर लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलीने घरच्यांना सांगितल्यावर पाली पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी केला.
आरोपी मोहन धोंडे शिर्के यास भादविस कलम 354 सह बाल लैगिक अपराधा पासून बालकांचे संरक्षण अधिनियम 10 व 12 प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला. या खटल्याची सुनावणी विशेष सत्र न्यायालय माणगाव रायगड येथे झाली. सदर गुन्ह्याच्या कामी अभियोग पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील योगेश तेंडुलकर यांनी काम पाहिले. याकामी पीडित मुलगी व फिर्यादीची साक्ष न्यायालयात महत्त्वाची ठरली. या केसमध्ये अभियोग्य पक्षास पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण धुमास्कर, पोलीस हवालदार छाया कोपनर व शशिकांत कासार, पोलीस शिपाई, सुनील गोळे, सोमनाथ ढाकणे यांनी मदत केली. याकामी अभियोग पक्षातर्फे अॅड.योगेश तेंडुलकर यांनी वरिष्ठ न्यायालयाच्या महत्त्वाचे निर्णय दाखल केले. सदर साक्ष व न्यायनिर्णयाच्या आधारे विशेष सत्र न्यायाधीश माणगाव पी. पी. बनकर यांनी निर्णय दिला.






