महिला काँग्रेसची मागणी
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरान मधील पाण्याचे दर कमी करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दर वर्षी रुपये दोन कोटीचे अनुदान देण्याची मागणी माथेरानच्या राष्ट्रीय महिला काँग्रेसने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर.सी.घरत यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे केली आहे.
माथेरान हे मुंबई-पुणे जवळील सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी येथे लाखो पर्यटक या पर्यटनस्थळाला भेट देत असतात. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे उल्हासनदीचे पाणी नेरळ येथून पंपिंगच्या साहाय्याने माथेरानला पाणी पुरवठा करते.सदर पाणीपुरवठा योजना डोंगराळ भाग असल्याने सुरवाती पासूनच तोट्यात जात आहे. त्यामुळे सातत्याने प्रत्येक तीन वर्षात पाणी बिलात भरमसाठ वाढ होत आहे. या पाणी दरवाढीमुळे माथेरानकरांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिक,व्यावसायिक प्रचंड त्रस्त आहेत. त्यामुळे एमजीपीचा आर्थिक तोटा कमी करणे हाच एकमेव पर्याय असल्याने राज्य शासनाने दरवर्षी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दोन कोटी रुपये इतके अनुदान देण्याची मागणी माथेरान राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा शिंदे यांनी काँग्रेस नेते आर.सी.घरत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी माथेरान महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा शिंदे, उपाध्यक्षा कामिनी शिंदे, सचिव सुहासिनी दाभेकर, माजी नगरसेविका विदुला खेडकर आणि रायगड जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस शिवाजी शिंदे उपस्थित होते.