। माणगाव । प्रतिनिधी ।
लोणेरे येथील तरुणी हत्याकांडातील मुख्य आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार याला अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. गेल्या सहा दिवसांपासून पोलीस या नराधमाच्या मागावर होते. अखेर नवी मुंबई आणि ठाणे परिसरात सापळा रचून रायगड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीला अलिबाग जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने दि. 30 एप्रिल पर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
लोणेरे येथील मुंबई गोवा महामार्गालगत आलेल्या ओमकार रेसिडेन्सी येथे दि. 20 एप्रिल रोजी रुम नंबर 101 मध्ये हॉटेल सफाई कामगार गेला असता दरवाजा ठोकावल्यानंतर आतून कोणताही प्रतिसाद असल्याने लॉजिंग चालकाला संशय आल्याने त्यांनी तातडीने गोरेगाव पोलीस ठाणे येथे संपर्क केला होता. गोरेगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर तरुणी बेडवर ब्लँकेट अंगावर असलेल्या अवस्थेत दिसून आली होती. पोलिसांनी ब्लँकेट हटविले असता रक्तबंबाळ अवस्थेत धारदार शस्त्राने तरुणीवर वार केल्याचे निदर्शनास आले. तातडीने फॉरेस्निक टीम, डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल होते. या मृत तरुणीचे नाव पल्लवी मोरे (22) रा. वडगाव बौध्दवाडी, ता. माणगाव असे होते.
गोरेगाव पोलीस ठाणे येथे आरोपी अनिस मोहम्मद खान मालदार (38) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील मौजे तळवली येथील रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी आरोपी गाव सोडून मुंब्रा येथे राहायला गेला होता. स्वतःच्या मुलीच्या हत्या प्रकरणी काही काळ कारागृहात देखील होता. रायगड पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते. आरोपीचे नाव आणि ओळख पटल्यानंतर त्याला शोधण्यासाठी पोलीस टीम रवाना करण्यात आल्या होत्या. त्या लॉजचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते, पण आजूबाजूचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळविले होते. त्या व्यतिरिक्त रूममध्ये जे जेवणाचे पार्सल पडलेले होते, ते आजूबाजूच्या हॉटेलवरून आणलेले असावे, त्या संदर्भानेही शोध घेतला होता. अखेर पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीला अटक करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अखेर नवी मुंबई-ठाणे परिसरातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी अनिस मालदार याने तरुणीची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.







