। पनवेल । प्रतिनिधी ।
नवरात्रोत्सवाच्या बंदोबस्तादरम्यान पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपीला पकडण्यात यश आले. दीपक फतेसिंग सुरडकर (44) रा. सोमठाणा, ता. चिखली, जि. बुलढाणा असे त्याचे नाव असून, त्याला पुढील तपासासाठी बुलढाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.9) सायंकाळी पनवेल एसटी स्थानक परिसरात करण्यात आली.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या आदेशानुसार पनवेल एसटी स्थानक परिसरात विशेष मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी हाताला जखम झालेला एक व्यक्ती पोलिसांच्या नजरेस पडला. त्याच्या संशयास्पद हालचाली लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची चौकशी करण्यात आली. सुरुवातीला त्याने त्याचे नाव आणि पत्ता सांगण्यास टाळाटाळ केली. मात्र, विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर त्याने आपली ओळख दीपक फतेसिंग सुरडकर अशी सांगितली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीची पडताळणी केली असता, तो बुलढाणा जिल्ह्यातील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वादातून आई सरस्वती (75), भाऊ संजय (48) आणि पुतण्या रजित (21) यांची हत्या केल्याचे संशयिताने चौकशीदरम्यान सांगितले. या घटनेनंतर पोलिसांच्या भीतीने तेथून निघून आल्याचे त्याने चौकशीत सांगितले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षक भूषण गावंडे आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. पडताळणीदरम्यान चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. वरिष्ठांच्या सूचनेनुसार संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर चिखली पोलीस ठाणे आणि बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पनवेल शहर पोलीस ठाण्यातून त्याचा ताबा घेतला आणि पुढील तपासासाठी त्याला बुलढाणा येथे नेले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विश्वनाथ पाटील, पोलीस अंमलदार संजय घाडगे, पोलीस हवालदार ढेंबरे, पोलीस नाईक केशव निकम आणि पोलीस अंमलदार महेंद्र गळवे यांनी सहभाग घेतला. संशयास्पद हालचालींची वेळीच दखल घेऊन गंभीर गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल पनवेल शहर वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांचे कौतुक होत आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी सतर्क राहावे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास कायदा हातात न घेता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पनवेल शहर वाहतूक शाखेने केले आहे.
तिहेरी हत्याकांडातील आरोपी जेरबंद!
