पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील विचुंबे येथील दोघा बाप लेकाची हत्या केलेल्या आरोपीना न्यायालयाने दोषी धरून जन्मठेप आणि दोन लाख एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. फिर्यादी मिराबाई याना दंडाच्या पूर्ण रक्कमेतून 50 टक्के रक्कम आणि उर्वरित 50 टकके रक्कम अस्मिता रूपेश म्हात्रे याना नुकसानभरपाई म्हणून देण्यास न्यायालयाने आदेश दिलेले आहेत.
28 डिसेंबर 2016 रोजी पनवेल मधील विचुंबे येथे आरोपी मंगेश गणपत म्हात्रे (वय – 32), रविंद्र गणपत म्हात्रे, (वय – 30), सुनिता गणपत म्हात्रे, (वय 65 रा. विचुंबे) यांनी संगनमताने जुन्या भांडणाचा राग आणि डिसेंबर 2016 रोजी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून विचुंबे येथील लक्ष्मण म्हात्रे व रुपेश म्हात्रे याना ठार मारले होते. आरोपी मंगेश म्हात्रे, रविंद्र म्हात्रे आणि सुनिता म्हात्रे यांच्या जागेमध्ये बेबीबाई जाधव यांनी घर बांधले होते. ते बांधलेले घर काढून टाक अशी वादावादी चालू असताना यातील मयत लक्ष्मण
लिकर्या म्हात्रे, रूपेश लक्ष्मण म्हात्रे हे आरोपींना समजावण्यासाठी गेले असता त्यांच्यात धक्काबुक्की झाली. या प्रकरणाबाबत मयत यांनी आरोपीविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता या गोष्टीचा आरोपींनी मनात राग धरून त्याच दिवशी दुपारी 3 वा. आरोपी हे मयत लक्ष्मण म्हात्रे आणि रूपेश लक्ष्मण म्हात्रे यांच्या घरी हातात पारई, सळई आणि चाकु अशी हत्यारे घेवून गेले. आणि पारईने आरोपी मंगेश याने लक्ष्मण यांना ठार केले. आरोपी रविंद्र याने रूपेश यावर चाकुने गंभीर वार केले, त्यात ते मृत्यमुखी पडले. तसेच आरोपी सुनिता हिने फिर्यादी मिराबाई हिला लाठी काठीने मारून गंभीर दुखापत केली. या गुन्हयाची नोंद खांदेश्वर पोलीस ठाणे येथे करण्यात आली. सदरच्या खटल्याची सुनावणी अति. सत्र न्यायाधीश – 1, राजेश अस्मर सो. यांच्या न्यायालयात झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष शासकीय अभियोक्ता, अॅड. सतिश म्हात्रे यांनी एकुण 16 साक्षीदारांची साक्ष नोंदविली. या केसमध्ये फिर्यादी मिराबाई लक्ष्मण म्हात्रे, साक्षीदार अस्मिता रूपेश म्हात्रे, नितीन लक्ष्मण म्हात्रे, बेबीबाई जाधव, भास्कर भोपी, डॉ. रितीका चव्हाण, डॉ.अवसरमल आणि तपासिक अंमलदार संतोष जाधव, सहा. पो. नि. आणि बालवडकर, आहिरराव यांची साक्ष महत्वाची ठरली. तपासिक अंमलदार, संतोष जाधव, सहा. पोलीस निरीक्षक, खांदेश्वर पोलीस ठाणे यांचा तपास महत्वाचा ठरला. सरकारी पक्षातर्फे विशेष शासकीय अभियोक्ता, अॅड. सतिश म्हात्रे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद आणि दाखल केलेले न्यायनिर्णय ग्राह्य धरून अति. सत्र न्यायालय 1, राजेश अस्मर यांनी 16 डिसेंबर 2021 रोजी आरोपी मंगेश गणपत म्हात्रे, रविंद्र गणपत म्हात्रे, सुनिता गणपत म्हात्रे यांना दोषी धरून आजन्म कारावास (जन्मठेप) आणि दोन लाख एक हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.