पनवेल शहर महिला पथकाची कामगिरी
| पनवेल | प्रतिनिधी |
कुंडेवहाळ गावात एका महिलेचा गळा आवळुन खून झाल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात माहिती प्राप्त झाली होती. त्यावरुन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता संगिता नामदेव म्हात्रे (55) या मृत अवस्थेत आढळुन आल्या. तसेच, त्या ठिकाणी अधिक तपासणी केली असता मृत महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागीने चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. संगिता म्हात्रे यांच्या मुलाने या संदर्भात पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधारे पनवेल महिला पोलीस पथकाला आरोपीला शोधण्यात यश आले आहे.
दरम्यान, घटनास्थळी कोणतेही सीसीटिव्ही फुटेज किंवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने आरोपीताबाबत माहिती मळिवणे अत्यंत अवघड जात होते. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासकामी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली होती. त्याप्रमाणे परिसरातील रहिवाश्यांकडे चौकशी करण्याची कामगिरी महिला पथकाकडे देण्यात आली. त्यांनी परिसरातील सुमारे 30 महिला व पुरुष यांच्याकडे तपास केला. त्यामध्ये मोहंम्मद समीर अल्लाउद्दीन अन्सारी (23) याच्याकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने संगिता म्हात्रे यांना 40 हजार रुपये उसने दिल्याचे सांगितले. तसेच, दिलेली रक्कम परत मागण्याकरीता त्यांच्या घरी गेला असता त्यांनी पैसे परत करण्यासाठी नकार दिला. त्यामुळे मोहंम्मद समीर अन्सारी याने जाणीवपूर्वक संगीता यांचा गळा आवळुन खून केल्याचे कबूल केले. आरोपीताबाबत कोणत्याही प्रकारची माहीती नसताना महिला पोलीस पथकाने सखोल तपास करुन, तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि नितीन ठाकरे, सपोनि प्रज्ञा मुंढे, सपोनि सारिका झांझुणें, सपोनि प्रविण फडतरे, पोउपनि विनोद लभडे, पोउपनि हजरत पठाण, पोउपनि प्रियांका शिंदे, पोलीस हवालदार ज्योती दुधाणे, देवांगी म्हात्रे, महिला पोलीस शिपाई अर्चना देसाई, साधना पवार, ज्योती कहांडळ, सुप्रीया ढोमे, सुशीला सवार, तेजश्री काशिद, स्वाती पाचुपते, पोशि विशाल दुधे यांनी केली.
