अंमली पदार्थ जवळ बाळगणार्‍या आरोपींस सश्रम कारावास

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
गांजा हा विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणार्‍या दोघाजणांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश अस्मर यांनी 13 वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्यकी दीड लाख रुपये दंड न भरल्यास 2 वर्ष कैद अशी सजा सुनावली.
याबाबतचे वृत्त असे की, दि. 21 मार्च 2018 रोजी महेश व्हटकर आणि संताजी मल्हारी खरात हे दोघे 73 लाख 66 हजार रुपये किमतीचा 377 किलो वजनाचा गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगून वाहतुक करत होते. मालमत्ता व अमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई यांनी सदर आरोपींना ताब्यात घेतले आणि गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनाव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) अधिनियम, 1985 चे कलम 8(क) 20, 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
या खटल्याची सुनावणी अति सत्र न्यायाधीश 1 राजेश अस्मर यांच्या समोर झाली. या प्रकरणामध्ये सरकारी पक्षातर्फे शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. भूषण साळवी यांनी एकुण 5 साक्षीदारांची साथ नोंदविली. सदर केसमध्ये तपासिक अंमलदार राणी काळे व पोलिस निरीक्षक सुनिल बाजारे आणि साक्षीदार रमेश उतगीकर यांनी साक्ष महत्वाची ठरली. यामध्ये फितुर झालेले साक्षीदार योगेश पाटील यांची सरकारपक्षामार्फत फितुर झाल्यावर त्याचा उलटतपास घेण्यात आला होता त्याचा विचार निकालपत्रात करण्यात आला आहे. जिल्हा सरकारी वकील तथा शासकीय अभियोक्ता अ‍ॅड भूषण साळवी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय दाखल करून प्रभावीपणे युक्तिवाद केला. त्यामध्ये आरोपाचे कृत्य हे समाजास हानिकारक असल्याकारणाने त्यांना शिक्षा देवून योग्य तो संदेश समाजात जाणे आवश्यक आहे असा युक्तिवाद न्यायालयाने ग्राहय धरला आणि दोन्ही आरोपीस न्यायालयाने 13 वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्यकी 1 लाख 50 हजार रुपये दंड न भरल्यास 2 वर्ष कैद अशी सजा सुनावली.

Exit mobile version