सराईत गुन्हेगाराला अटक; 15 लाख 83 हजार किमतीचा माल जप्त
| पनवेल | प्रतिनिधी |
अमली पदार्थ विरोधी पथकाने कळंबोली येथील स्टील मार्केट परिसरात छापा मारून अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. राजन बाळा राठोड (33) असे या सराईत गुन्हेगाराचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल 15 लाख 83 हजार रुपये किमतीचे हेरॉईन आणि गांजा जप्त केला आहे. या आरोपीवर यापूर्वी आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे.
पनवेल तालुक्यात दररोज विविध प्रकारचे गुन्हे घडतच असतात. त्यात अमली पदार्थाची खरेदी-विक्री या घटनांत प्रचंड प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे तरूण वर्ग अंमली पदार्थाच्या वळिख्यात अडकत असून त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. यावर संबंधित प्रशासनासह पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी पनवेलकरांकडून करण्यात येत आहे. अशातच आता अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला आरोपी राजन राठोड हा गोवंडी येथे राहत असून तो कळंबोली स्टील मार्केट परिसरात अंमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मळािली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे व त्यांच्या पथकाने कळंबोली स्टील मार्केट परिसरात सापळा लावला होता. यावेळी संशयित आरोपी राजन राठोड हा त्या परिसरात आला असता त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळ 1 किलो 800 ग्रॅम गांजा आणि 30 ग्रॅम हेरॉईन असा एकूण 15 लाख 83 हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ सापडला. त्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने आरोपी राजन राठोड जवळ सापडलेला अंमली पदार्थ जप्त केला. न्यायालयाने या आरोपीला 24 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपीचा गुन्हेगारी इतिहास
अटक करण्यात आलेला आरोपी राजन बाळा राठोड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यांत गंभीर गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. त्यात एनडीपीएस कायदा, मारहाण, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे. त्याच्यावर उरण, शिवाजीनगर, देवनार, आरसीएफ या पोलीस ठाण्यांत 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांनी दिली.






