कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदारांना मारहाण
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
आरोपी जेव्हा तक्रार नोंदविण्याकरिता पोलीस ठाण्यात आला होता, तेव्हा त्याने अतिप्रमाणात दारुचे सेवन केले होते. त्याच्या नाकातोेंडाला मार लागून रक्तस्त्राव होत असल्याने ठाणे अंमलदारांनी त्यास शांत राहा, तुमची तक्रार घेतो असे सांगितले. तसेच झालेल्या दुखापतीवर औषधोपचाराकरिता दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याची तयारी दर्शविली असता, आरोपीने मी औषधोपचाराकरिता सरकारी दवाखान्यात जाणार नाही असे बोलून आरडाओरड करुन रात्री वायरलेस ड्युटीवर असलेल्या महिला फिर्यादी यांच्या अंगावर धावून गेला. त्यास उपचाराकरिता सरकारी दवाखान्यात घेऊन जात असताना रात्री कर्तव्यावर असलेल्या पोलीस हवालदार यांच्या अंगावर पोलीस ठाण्याच्या आवारात धावून त्यांच्या नाकावर बुक्की मारली. त्यामुळे दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. यावरच न थांबता शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
सदर घटना शुक्रवारी (दि.22) घडली. याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनावणे हे करीत आहेत.