प्रचारासाठी वाढती मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
मावळ लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर वाढला असून प्रचार रॅली तसेच सभांसाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांची गर्दी जमविण्यासाठी पक्ष पदाधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. प्रचार पत्रके वाटण्यासाठी तसेच रॅलीत सहभागी होण्यासाठी कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्यात येत आहे. यामध्ये नाका कामगारांना अच्छे दिन आले आहेत. प्रचारासाठी त्यांची रोजंदारीवर नियुक्ती करण्यात आली आहे, तर काही कार्यकर्त्यांना विशिष्ट रक्कम देऊन प्रचारात गुंतवण्यात आले आहे.
आगामी निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांना पक्षाकडून काही रुपये भत्ता अन् दोन वेळचे जेवण दिले जात आहे. तर बहुतेक पक्षांकडून नाका कामगारांनादेखिल निवडणुकीच्या प्रचारासाठी पसंती देण्यात येत आहे. पनवेल व कळंबोलीमध्ये वय व नीटनेटकेपणा पाहून ठराविक नाका कामगारांना हजेरीवर घेतले जात आहे. सध्या या कामगारांचा भाव वाढला असून विविध पक्षांकडून मागणी असल्याने सकाळी एका पक्षासोबत आणि सायंकाळी दुसर्या पक्षाचा प्रचार करण्यात ते व्यस्त दिसत आहेत.
प्रचारात दोन पैसे अधिक मिळत असल्याने नाका कामगार, बांधकाम क्षेत्रातील मजूर मोठ्या संख्येने प्रचारात गुंतले आहेत. उमेदवारांच्या प्रचारासाठी शहर व ग्रामीण परिसरात नेत्याच्या जवळच्या पदाधिकार्यांकडून अनेक नाका कामगारांची जमवाजमव करण्यात आली आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थादेखिल पक्षाकडून करण्यात येत आहे. झोपडपट्टी परिसरातील काही ठराविक महिला व पुरुषांना यासाठी बोलावले जात आहे. ग्रुप प्रमुखास निरोप मिळाल्यानंतर बाकीचे कामगार रॅलीसाठी तयार होतात. नियोजित स्थळी प्रचाराची टोपी, शेला, पत्रके अन् बॅनर घेऊन ते हजेरी लावतात. तसेच, गर्दी जमविण्यासाठी काही पदाधिकार्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.