10.40 लाखांची फसवणूक; पनवेलमध्ये गुन्हा दाखल
| पनवेल | प्रतिनिधी |
लग्नासाठी वापरण्यात येणाऱ्या वेबसाईटवरून ओळख वाढवत विश्वास संपादन करून एका 38 वर्षीय महिलेची तब्बल 10 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पनवेलमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी अनोळखी इसमाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या विवाहासाठी एका मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नोंदणी केली होती. यावेळी स्वतःला ‘अमन सिंग’ असे सांगणाऱ्या इसमाने यूकेहून बोलत असल्याचे भासवून महिलेचा विश्वास संपादन केला. व्हॉट्सॲपद्वारे संवाद वाढवत त्याने विविध कारणे सांगून पैशांची मागणी सुरू केली.
सुरुवातीला केनियाला जाण्यासाठी अडचण असल्याचे सांगत त्याने रक्कम मागितली. त्यानंतर भारतात येण्यासाठी फ्लाईट तिकीट काढले असून ऑनलाइन व्यवहारात अडचण असल्याचे कारण देत वारंवार पैसे उकळले. अशाप्रकारे महिलेने वेळोवेळी एकूण 10.40 लाख रुपये पाठवले. यानंतर 2 मार्च रोजी एका महिलेने ‘कस्टम अधिकारी’ असल्याचे सांगत फोन केला आणि अमन सिंगवर मनी लॉन्डरिंगची कारवाई होणार असल्याचे सांगून ‘प्रमाणपत्र’ काढण्यासाठी साडेचार लाख रुपयांची मागणी केली. मात्र संशय आल्याने पीडित महिलेने ओळखीच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता अशा प्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.पनवेल शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.







