गोपाळ पाटील आणि सहकारी यांची निर्दोष मुक्तता

| उरण | प्रतिनिधी ।

उरण तालुक्यातील डीपीवर्ल्ड कंपनीत सुमोख मोकल कामगार मयत झाला होता. या मयत कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केल्याप्रकरणी उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील व इतर सहकार्‍यांवर कंपनी प्रशासनाने गुन्हा दाखल केला होता. याविरोधात न्यायालयीन लढाई गेली 10 वर्षांपासून सुरू होती. परंतु वकील किशोर ठाकूर व वकील प्रवीण ठाकूर यांनी न्यायालयात यशस्वीपणे बाजू मांडल्याने आरोपिवरील आरोपपत्र सिद्ध झाले नाही. त्यामुळे गोपाळ पाटील व त्यांच्या सहकार्‍यांसह एकूण 17 जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

तालुक्यातील चिरनेर गावचा सुमोख मोकल हा तरुण डीपीवर्ल्ड कंपनीत काम करीत होता. सदर कर्मचारी मयत झाल्यानंतर कुटुंबाने कंपनी प्रशासनाने 2 वर्षे दुर्लक्ष केल्यामुळेच मयत झाल्याचा आरोप केला होता. मयत मोकल याच्या कुटूंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मयताची बॉडी कंपनीच्या गेटवर ठेवण्यात आली होती. यावेळी अंत्ययात्रेसाठी जमलेली माणसे सामील झाली होती. याप्रसंगी मयत कामगार मोकल यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू होते.

कंपनी प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करीत उपस्थितांवर सरकारी कामात अडथळा व जमावबंदी असे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एक गुन्हा उरण पोलीस ठाण्यात तर दुसरा गुन्हा न्हावा शेवा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. त्यापैकी चार वर्षांपूर्वी एका गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. दुसर्‍या खटल्यातील शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर रोजी सर्वच्या सर्व म्हणजे 10 वर्षांनी गोपाळ पाटील व इतर सहकारी असे एकूण 17 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या खटल्याचे कामकाज वकील किशोर ठाकूर व वकील प्रवीण ठाकूर यांनी काम पाहिले.

Exit mobile version