एका दिवसात 76 वाहनचालकांकडून दंड वसूल
| पनवेल । वार्ताहर ।
चारचाकी वाहनांच्या कांचावर बसवलेल्या काळ्या फिल्मविरोधात पनवेल शहर वाहतूक पोलिसांनी उघडलेल्या धडक मोहिमेंतर्गत एका दिवसात 76 गाड्यांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही करवाई करण्यात येत असल्याची माहिती पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.
चारचाकी गाड्यांच्या बाजूच्या काचा पन्नास टक्के व मागच्या बाजूची काच सत्तर टक्के पारदर्शक असावी, असे मोटार वाहन कायद्यात नमूद करण्यात आले आहे. मात्र सर्रासपणे याहून अधिक काळ्या फिल्मच्या काचा बसविण्यात येत असल्याची बाब वारंवार समोर येत असते. याबाबत चारचाकी गाड्यांच्या काचांना कोणत्याही प्रकारची फिल्म लावू नये, असे न्यायालयाने दिले होते. त्यानुसारच आजपर्यत या वाहनावर कारवाई सुरूच आहे. मात्र वर्षभर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या वतीने काळ्या काचा लावणार्या चारचाकी वाहनावर कारवाईची मोहीम सुरूच असते. मात्र एका दिवसात धडक मोहीम पनवेल शहरात राबवून, या कारवाईत 76 वाहनावर कारवाई केली. त्यानुसार त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी दिली.
विक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा
वाहनांच्या काचांवर काळ्या फिल्म बसवणार्या विक्रेत्यांवरही आरटीओने आता कारवाईचा बडगा उगारणार आहे. तसेच उत्पादकांनीही वाहनांचे उत्पादन करताना पारदर्शक काचा बसवाव्यात, अशा सूचना पनवेल आरटीओ कार्यालयातून करण्यात आल्या आहेत. वाहनांची नोंदणी व नूतनीकरण करताना काळ्या फिल्म आढळल्यास त्या त्वरित काढून टाकण्यात येणार असून, ते वाहन जोपर्यंत पारदर्शक काचा बसवून पुन्हा येत नाही, तोपर्यंत संबंधित वाहनांची नोंदणीच केली जाणार नसल्याचे आरटीओकडून सांगण्यात आले.
चारचाकी वाहनाच्या काचा काळ्या करणे, हे वाहतूक नियमांच्या विरोधात आहे. वाहन चालकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच उल्लंघन करणार्यांना पनवेल वाहतूक विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.
संजय नाळे,
पोलिस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा