शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने दोघांविरोधात कारवाई
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने डिझेल तस्करीतील सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे यांच्याकडे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र आरोपींनी जामीन देण्याबाबत जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कारवाई करीत न्यायालयीन कोठडी सुनावली. रायगड पोलिसांच्या या कारवाईने डिझेल माफियांना दणका मिळाला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रात डिझेल तस्करीला बंदी असतानादेखील जिल्ह्यातील काही समुद्रकिनारी मोरेश्वर नाखवा, गणेश नाखवा हे दोघेजण डिझेल तस्करी करीत होते. करोडोची लुट केली जात होती. रेवस बंदरावस रेवदंडा बंदर अशा अनेक ठिकाणी यांचा हा धंदा राजरोसपणे सुरु होता. डिझेल तस्करीमुळे सागरी सुरक्षा धोक्यात येण्याची भिती निर्माण झाली होती. अखेर रायगड पोलिसांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. मांडवा सागरी, रेवदंडा पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या डिझेल माफियांकडून सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये म्हणून भारतीय न्याय संहिता 129 प्रमाणे रायगडचे अपर पोलीस अधीक्षक तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी अभिजीत शिवथरे यांच्याकडे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यामध्ये आरोपींना जामीन देणेबाबत आदेश दिले होते. परंतु आरोपीने जामीन देणेबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई केली. त्यांना वेळोवेळी वाजवी संधी देऊनही त्यांनी जामीन दिला नाही. तो जामीन देणेस असमर्थ ठरल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्यात आले. वॉरंटची बजावणी करुन मांडवा सागरी पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक केले. त्यानंतर त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. नैसर्गिक न्याय तत्वानुसार संधी देऊनही ते जामीन देऊ शकले नाही. त्यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. गुन्हेगारांवर सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था भंग होवु नये यासाठी जनहितार्थ सराईत गुन्हेगारांविरोधात कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
डिझेल साठवणूक करणे पडले महागात
18 जणांविरोधात गुन्हा दाखल
बेकायदेशीररित्या डिझेल साठवणूक, वाहतूक व खरेदी केल्याप्रकरणी 18 जणांविरोधात येलो गेट पोलिसांनी कारवाई केली. अरबी समुद्रात जवाहर द्वीप परिसरात ही कारवाई शुक्रवारी पहाटेच्या सुमारास झाली. 13 लाख 37 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यात तीन हजार 750 लिटरचा डिझेलचा आणि मासेमारी बोटीचा समावेश आहे. यातील काही आरोपी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत आहे. डिझेल साठवणूक करणे तस्करांना महागात पडले.







