| वसई | प्रतिनिधी |
वसई विरार शहरात छुप्या मार्गाने गावठी दारूच्या हातभट्ट्या लावल्या जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. नुकताच वसई गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाने नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामण येथील देवकुंडी जंगल परिसरात अवैधरीत्या चालणाऱ्या गावठी दारूभट्ट्या उध्वस्त केल्या आहेत. यात सुमारे तीन लाखाचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
वसई विरारमध्ये जंगल, डोंगर, कांदळवन क्षेत्र अशा विविध ठिकाणच्या भागात गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्ट्या लावण्यात येत आहेत. त्यातून तयार होणारी दारू विविध ठिकाणी वितरित केली जात आहे. दिवसेंदिवस गावठी दारू हातभट्टीचे अड्डे वाढत आहेत.अशा बेकायदेशीर व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नुकताच नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कामण येथील देवकुंडी जंगल परिसरात अवैधरीत्या गावठी दारू तयार करण्यासाठी हात भट्टी लावली जात असल्याची गुप्त माहिती वसई गुन्हे शाखा कक्ष 2 च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तातडीने त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे. कारवाई मध्ये 3 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.







