गुरांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर कारवाई

टेम्पो जप्त, गुरांची गोशाळेत रवानगी

| नेरळ | प्रतिनिधी |

गुरांची अवैध वाहतूक करणार्‍यांवर नेरळ पोलिसांच्या पथकाने कारवाई केली आहे. गुरांची अवैध वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले असून, गुरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे. दरम्यान, वाहन चालक आणि क्लीनर पळून गेले आहेत.

गुरांनी भरलेला मिनी टेम्पो क्रमांक एमएच 05 ईएल 8619 हा नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे आणि त्यांच्या पथकाने चिकनपाडा येथे थांबवून त्याची तपासणी केली. त्यादरम्यान चालक आणि क्लीनरने पोलिसांना चकवा देत येथून पळ काढला. किसवे यांनी टेम्पोची पाहणी केली असता त्यामध्ये तांबड्या रंगाची आखुड शिंगे असलेली मोठ्या पोटाची गाय अंदाजे वय सात वर्षे, काळ्या रंगाचा आखूड शिंगांचा बैल अंदाजे वय पाच वर्षे, काळ्या रंगाचे शिंगे फुटलेला वय अंदाजे दीड वर्षे, काळ्या तांबूस रंगाची शिंगे नसलेली गाय अंदाजे वय सहा महिने असे चार गोवंशीय जनावरे आढळून आली.

याबाबत श्री. किसवे यांनी प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे कळविले. फरार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एका आरोपीला पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे, तर दुसर्‍या आरोपीचा शोध सुरु आहे. चारही गोवंशीय जनावरांना नेरळ येथील गोशाळा येथे रात्री सोडण्यात आले असून, मिनी टेम्पो ताब्यात घेण्यात आला आहे. किसवे यांच्या कामगिरीमुळे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. अधिक तपास शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक लोढे करीत आहेत.

Exit mobile version