215 किलो गोमांससह जिवंत जनावरे ताब्यात
| नेरळ | वार्ताहर |
रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून कर्जत तालुक्यातील दामत गावात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यांवर धाड टाकण्यात आली. त्यावेळी गोमास विकणार्या एकास अटक केली असून, यावेळी अर्धवट कापण्यात आलेल्या चार गायींचे 215 किलो गोमांस जप्त करण्यात आले. तर, कत्तलीसाठी आणलेली काही जिवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांना गोशाळेत पाठविण्यात आले आहे. पोलिसांच्या धाडीमुळे दोन आरोपी पळून गेल्याची माहिती मिळत आहे.
कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील दामत गावात अवैध गोमास विक्री आणि अवैध कत्तल केली जात असल्याची खात्रीलायक माहिती गुप्तचार यंत्रणेकडून रायगड जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी पाटील यांना मिळाली होती. त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. 4 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नेरळ पोलीस दामत गावात घेराबंदी करून धाड टाकली. यावेळी 19 वर्षीय आरोपीं उसामा वसीम नजे हे त्यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेत हत्यार्यासोबत चार गाई ह्या अर्धवट कटिंग केलेल्या ठिकाणी सापडून आला होता. तर काही गोमांस हे कापून लटकवलेले आढळले होते. याशिवाय काही अंतरावर एका बंदिस्त खोलीत कत्तलीसाठी आणले आठ जिवंत जनावरे आढळून आली. तेथे जनावरे वाहून नेण्यासाठी आणलेली पिकअप टेम्पो सापडून आल्याने जिवंत जनावरे आणि टेम्पो स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतली. मात्र यावेळी दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत तर गोमांस खरेदी करण्यासाठी आलेले दोन इसम यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती आता समोर आली आहे.धाडी नंतर आणखी काही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सुरुवातीला अधिकारी वर्गाकडून माध्यमांना देण्यात आली होती.
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी ठाकूर, श्रीवर्धन, चिमटे, मोरे, म्हात्रे यांसह सर्व टीमने ही कारवाई केली आहे. यामध्ये नेरळ पोलिसांनीदेखील सहकार्य केले आहे. एकूणच पळून गेलेल्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत असून, एकाला ताब्यात घेण्यात आल्याने याबाबत आता नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.