| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन पोलिसांनी बुधवारी (दि.22) सकाळी साडेसात वाजता श्रीवर्धन-म्हसळा मार्गावरती 24 किलो गोवंशीय मासाची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गोवंश मासाची विक्री होण्याची घटना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अझमततुल्ला अब्दुल रशीद नाडकर (60) यांच्या विरोधात श्रीवर्धन पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे. या गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची स्कुटी देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप राठोड हे करीत आहेत. पोलिसांनी केलेल्या या कारवाई बद्दल हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.
परंतु, या अगोदर देखील मेटकर्णी येथील एका आरोपीला स्कुटीवरून गोवंश मांस घेऊन येताना पोलिसांनी पकडले होते. हे मांस माणगाव तालुक्यातील मोरबा येथून आणल्याचे आरोपीने सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशाची कत्तल केली जात आहे. परंतु, या प्रकाराकडे पोलिसांचे सपशेलपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. त्यामुळे हे रायगड जिल्हा पोलिसांचे अपयशच म्हणावे लागेल. राज्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा लागू झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील कर्जत, महाड, माणगाव त्याचप्रमाणे श्रीवर्धन तालुक्यात गोवंशाची कत्तल होत असल्याचे पाहायला मिळाले होते. तरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी याबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.







