| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर शहरातील पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर एक्टिव्हा घसरल्याने तरुण गंभीर जखमी झाला होता. बुधवारी (दि.22) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातातील जखमी तरूणावर प्राथमिक उपचार करून त्याला पनवेल येथे रवाना करण्यात आले. परंतु, नागोठणेदरम्यान त्या तरूणाचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महालगुर येथील जय धोंडू कदम हा कामानिमित्त एक्टिव्हावरून पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवरून जात होता. यावेळी एक्टिव्हा घसरल्याने जय कदम हा रोडच्या डिव्हायडरवर आदळला. त्यामुळे त्याच्या डोक्याला खोलवर जखम होऊन रक्त वाहू लागल्याने तो अत्यवस्थ झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलादपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवलदार संदीप कदम, पोलीस कर्मचारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी पनवेल एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, जय कदम याला रूग्णवाहिकेने पनवेलकडे नेत असताना नागोठणेदरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे त्याचा मृतदेह पुन्हा पोलादपूरला आणण्यात आला.







