दीड हजार रिक्षाचालकांवर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून रिक्षा चालवणाऱ्या चालकांवर कळंबोली वाहतूक शाखेतर्फे जोरात कारवाई सुरू आहे. 1 जानेवारी ते 5 जुलैपर्यंत वाहतूक पोलिसांनी 1 हजार 611 रिक्षा चालकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पनवेलसह कामोठे, खारघर, खांदा कॉलनी, नवीन पनवेलमध्ये हजारो रिक्षा चालक रिक्षा चालवून आपला व्यवसाय करतात. मात्र यात देखील काही रिक्षा चालक नियमांना बगल देत रिक्षा चालवतात. बऱ्याच वेळेला वर्दी परिधान न करणे, बॅच न लावणे, लायसन्स न बाळगणे, वेडी वाकड़ी रिक्षा चालवणे, विना कागदपत्र रिक्षा चालवणे किंवा सिग्नल तोडणे हे प्रकार पहावयास मिळतात. त्यामुळे अपघात देखील होतात. सरकारी आदेश, नियम धाब्यावर बसवून अवास्तव भाडे आकारले जात आहे. अवैधरित्या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करुन प्रवाश्यांच्या जीवाशी खेळ सुरु आहे. बोगस रिक्षा चालकांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यावर बेशिस्तपणाचे दर्शन घडवत वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडविणाऱ्या बेशिस्त रिक्षाचालकांवर कळंबोली वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.

कळंबोली, खांदा कॉलनी परिसरात शेकडो रिक्षाचालक बेशिस्त पद्धतीने रिक्षा चालवत आहेत. त्यामुळे बेशिस्त रिक्षाचालकांबाबत काही नागरिकांनी वाहतूक शाखेकडे तक्रारी केल्या होत्या. वाहतूक शाखेकडून रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई येत आहे. यामध्ये प्रामुख्याने विना मीटर रिक्षा चालविणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, गणवेश परिधान न करणे, परवाना जवळ न बाळगणे आदी नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. कळंबोली वाहतूक शाखेतर्फे 1 जानेवारी ते 5 जुलै 2023 पर्यंत वाहतूक पोलिसांनी 1 हजार 611 रिक्षा चालकांवर कारवाई करत लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. बेशिस्त रिक्षाचालकांवर यापुढे देखील कारवाई सुरूच राहणार असून कुठेही अशा प्रकारची अचानक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती कळंबोली वाहतूक शाखेचे वपोनि हरिभाऊ बनकर यांनी दिली.

Exit mobile version