। पुणे । प्रतिनिधी ।
बारामती वाहतूक पोलिसांनी फटाका बुलेटवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. असे असतानाच, आता वाहतूक शाखेने फटाका सायलेन्सर विक्री करणार्या दुकानांवर कारवाई करत 16 फटाका सायलेन्सर ताब्यात घेत मुळावरच घाव घातला आहे.
काही दुकानांमधून बुलेटचालक हे फटाका सायलेन्सर बसवून घेतात, अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. याअनुषंगाने त्यांनी पोलीस कर्मचार्यांसह बारामती शहरातील सायलेन्सर विक्री करणार्या दुकानांमध्ये तपासणी केली. या तपासणीत 16 सायलेन्सर जप्त करण्यात आले. त्यामध्ये बाइकर्स स्पेअर पार्टस ऑटोमोबाईल्स, महालक्ष्मी ऑटोमोबाईल्स, महावीर ऑटोमोबाईल्स या तीन दुकानांमध्ये मोठ्या आवाजाचे सायलेन्सर मिळून आले. कारवाई सुरू केल्यापासून 51 सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस कर्मचारी सुभाष काळे, प्रदीप काळे, अजिंक्य कदम, प्रज्योत चव्हाण, सीमा घुले, स्वाती काजळे, रेश्मा काळे, रूपाली जमदाडे, माया निगडे, सीमा साबळे आदींनी केली आहे.
तसेच, 11 बुलेट चालकांकडून मोठ्या आवाजाचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बुलेट गाड्या वापरणार्या चालकांना आता सायलेंट सायलेन्सर वापरावे लागणार आहेत.