एसटी संपकर्‍यांवर कारवाईचा बडगा

मुंबई | प्रतिनिधी |
आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एसटी महामंडळ राज्य शासनात विलीन करण्याबरोबरच अन्य मागण्यांसाठी राज्यातील 250 पैकी 39 आगारांमध्ये संप सुरूच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू असून, सोमवारपासून कामगार कामावर रुजू न झाल्यास बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे परिवहन मंत्री व एसटी महामंडळ अध्यक्ष अनिल परब यांनी जाहीर केले.
एसटी कामगारांच्या संपामुळे राज्यातील लातूर विभागातील पाच आगारे, नांदेड विभागातील नऊ आगारे, भंडारा विभागातील सहापैकी तीन आगारे, गडचिरोली विभागातील सर्व तीन आगारे, चंद्रपूर विभागातील चार आगारे, यासह कोल्हापूर, वर्धा, सांगली, सोलापूर, नाशिक, यवतमाळ, अमरावती विभागातील एकूण 39 आगारे सायंकाळी पाचपर्यंत बंद होते. ज्या-ज्या ठिकाणी एसटी सेवा बंद होती तिथे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. काही राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कामगारांना संपास भाग पाडणे, आगारांना टाळे लावणे आदी प्रकार घडल्याचे एसटी महामंडळाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याविरोधात महामंडळाने ठिकठिकाणी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रोरीही नोंदविल्या आहेत, परंतु संप मिटत नसल्याने ऐन दिवाळीत महामंडळालाही नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कर्मचार्‍यांची समजूत काढून आगार सुरू करण्याचा प्रयत्न के ला जात होता. रात्री आठपर्यंत 39 पैकी आठ आगारे सुरू झाली. उर्वरित मात्र बंदच होते.

Exit mobile version