| आगरदांडा | वार्ताहर |
एलईडी व पर्सनेट मासेमारी करण्यावर बंदी असताना सुद्धा कोणालाही न जुमानता कायदा धाब्यावर बसून अलिबाग तालुक्यातील आक्षी साखर येथील काही मच्छिमार खोल समुद्रात मासेमारी करताना कोस्ट गार्डने रंगेहाथ पकडले आहे. मुरुड पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले कि, कोस्ट गार्ड टेहाळणी करीत असताना खोल समुद्रात या बोटी पकडण्यात आल्या आहेत. यामध्ये 4 एलईडी बोटी तर 6 पर्सनेट जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटी पकडण्यात आल्या आहेत. या सर्व बोटी पकडून आगरदांडा बंदरात आणल्या आहेत. काही दिवसापूर्वी एकदरा परिसरातील मासेमारी करणाऱ्या बोटीमधील मच्छिमारांना मारहाण केली होती.
ही घटना घडलेली असताना कोस्ट गार्डने टेहळणी करीत असताना नानवेल दीपगृहाच्या समोर असणाऱ्या समुद्र भागातून या बोटी पकडल्या आहेत. याबाबत अधिक माहिती देताना मुरुड तालुक्याचे मत्स्यविकास व परवाना अधिकारी तुषार वाळुंज यांनी सांगितले कि, दहा बोटीवरील 103 खलाश्यांवर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 व सुधारित अध्यादेश 2021 या अंतर्गत कार्यवाही करणार आहोत. एलईडी व पर्सनेट मासेमारीवर बंदी असताना सुद्धा मासेमारी करताना आढळून आले आहेत. त्यामुळे ही कारवाई करीत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.