अलिबाग नगरपरिषदेच्या पथकाची कारवाई
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग नगरपरिषदेच्या वतीने प्लास्टिक बंदी विरोधी मोहीम हाती घेतली आहे. सोमवारी पथकामार्फत वेगवेगळ्या दुकानांमध्ये छापे टाकण्यात आले. या छाप्यांमध्ये 12 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, 12 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानदारांविरोधात कारवाई करून त्यांना दणका देण्यात आला आहे.
प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. मानवी आरोग्यवरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे अलिबाग नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सागर साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदीविरोधी मोहीम राबविण्यात आली. नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, मुकादम प्रकाश तांबे, सुमित गायकवाड व आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी पथकाने सोमवारी शहरातील वेगवेगळ्या दुकानांमध्ये छापे टाकले. दूध उत्पादक व्यावसायिक, भाजी विक्रेते, हॉटेल व्यावसायिक, हार विक्रेते अशा अनेकांच्या दुकानात धाड टाकण्यात आली. अचानक झालेल्या छाप्यामध्ये 12 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. प्लास्टिक पिशवीचा वापर करू नका, असे आवाहनदेखील यावेळी करण्यात आले.
