म्हसळा पोलीस अॅक्शन मोडमध्ये
तीन रिक्षा, डंपर चालकांवर गुन्हा
| म्हसळा | वार्ताहर |
म्हसळ्यातील वाहतूक कोंडी करणार्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. तीन रिक्षा आणि एका डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने काही प्रमाणात कोंडी फुटू लागल्याचे जाणवत आहे. अरुंद रस्ते असलेल्या म्हसळा बाजार पेठेत तालुक्यातील ग्राहकांना स्वतःसाठी वाट काढणे अवघड होऊन बसले आहे. प्रवासी वाहतूक आणि मालवाहतूक करणारे वाहन चालक,मालक आपले ताबेतील वाहन बिनदिक्कतपणे सार्वजनिक रस्त्यावर उभी करून लोकांचे जीवितास धोका निर्माण होईल व वाहतूक कोंडी होऊन अडथळा निर्माण करताना दिसतात या विरुद्ध पोलिस निरीक्षक संदीपान सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी पोलीस शिपाई अंगद कोथींबिरी आणि मनोज मढवी यांनी तीन ऑटो रिक्षा आणि डंपर चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आरोपींवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.गुन्हा नोंद करण्यात आलेल्या किरण रिक्षाचालक परशुराम मुकणे ,रुपेश रामजी काणसे ,साजीद सईद हवालदार आणि डंपर चालक हसनमिया खामकर यांचा समावेश आहे.
या वाहन चालकांनी म्हसळा बाजार पेठेत रामलक्ष्मी कापड दुकानाचे समोर,दिघी नाका आणि डॉ. राऊत यांच्या दावाखान्या समोर आपली वाहन बिनदिक्कतपणे सार्वजनिक रस्त्यावर उभी करून वाहतूककोंडी केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे म्हसळा तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे. शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी घालण्यात आली असतानाही अनेक वाहनचालक सार्वजनिक रस्त्यावर गाडी उभी करून वाहतूककोंडी करीत असतात. सततच्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी ,ग्राहक, नागरीक यांचा वेळ नाहक वाया जातो तसेच अन्य वाहन चालकांचे इंधनही वाया जाते तर कधी कधी एकमेकाविरोधात शिवीगाळ,बाचाबाची होऊन त्याचे विपर्यास्त मोठ्या भानगडीत होते ते होऊ नये म्हणुन म्हसळा पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारावा अशी मागणी शांतता समिती सदस्यांनी केली होती.त्याची दखल घेत पोलिसांनी वाहतूक कोंडी करणार्या वाहन चालकांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे.