साडेपंचवीस लाखांची दंडवसुली; न्हावा-शेवा वाहतूक शाखेची कारवाई
| चिरनेर | प्रतिनिधी |
न्हावा-शेवा वाहतूक शाखेच्यावतीने अपघातांना आळा तसेच वाहनचालकांना रहदारीची शिस्त लावण्यासाठी चालू महिन्यात विशेष मोहीम आखून आत्तापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण 2450 वाहनचालकांविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांवर कारवाई करुन एकूण 25 लाख 50 हजार इतक्या रकमेचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी दिली.
जेेएनपीए परिसरात बेशिस्त वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाहन चालकांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे मात्र वाहतूक कोंडी, अपघात घडतात. अशा बेशिस्त वाहन चालकांना वठणीवर आणण्यासाठी, अपघातांना आळा तसेच वाहन चालकांना रहदारीची शिस्त लावण्यासाठी न्हावा-शेवा शाखेच्या वतीने विशेष मोहीम हाती घेतली होती. या विशेष मोहिमेत आतापर्यंत मोटर वाहन कायद्याखाली एकूण 2450 वाहन चालकाविरुद्ध विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई अंतर्गत विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवणार्या 950 चालकांविरुद्ध तसेच रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी चार चाकी व अवजड वाहने पार्क करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या 1250 वाहन चालकाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 25 लाख 50 हजार इतक्या रकमेचा दंड वसूल करण्यात आला आहे. जेएनपीटी तसेच उलवे परिसरातील वाहन चालकांनी महामार्ग तसेच अंतर्गत रस्त्यावर वाहने चालवताना स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मोटर वाहन कायद्याचे पालन करावे, असे आवाहन न्हावा-शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी केले आहे.