। पनवेल । प्रतिनिधी ।
शहरातील वडाळे तलावासह व्हि. के. हायस्कुल परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांविरोधात पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने धडक कारवाई केली आहे.
वडाळे तलावासह व्हि. के. हायस्कुल परिसरात अनेक तरुण दुचाकी, चार चाकी वाहने घेऊन हुल्लडबाजी करीत असतात. याचा नाहक त्रास या भागातील शालेय विद्यार्थांसह परिसरातील नागरिकांना होत होता. याबाबत अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याकडे विविध राजकीय पक्ष तसेच सामाजिक संघटना यांनी केल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्यासह पो.नि. अभंग व विशेष पथकाने या भागात धडक कारवाई करत हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना चांगलाच धडा शिकविला. त्यामुळे त्यांची चांगलीच पळती भुई झाली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या पुढे सुद्धा अश्या प्रकारे कारवाई सुरूच ठेवण्यात येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.







