रायगडच्या जिल्हा वाहतूक शाखेची कारवाई सुरु
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
शासनाची मान्यता नसताना बेकायदेशीररित्या काहीजण गाडीला लोगो बसवणे, पोलीस, प्रेस, ॲडव्होकेट स्टीकर लावण्याचे काम करतात. आता लोगो, स्टीकर लावणे महागात पडणार आहे. रायगडच्या जिल्हा वाहतूक शाखेने या विरोधात कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत 66 चालकांविरोधात कारवाई करीत 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला असल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईने स्टीकर, लोगो लावणाऱ्यांना दणका मिळाला आहे.
दुचाकीसह, तीन चाकी, चारचाकी व अन्य वाहनांवर स्टीकर, लोगो लावणे चुकीचे आहे. तरीदेखील काही मंडळी वाहनांवर स्टीकर, लोगो लावतात. हा गैरप्रकार टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. पोलीस, पत्रकार, प्रेस, महाराष्ट्र शासन आदी लोगो लावणाऱ्याबरोबरच गाडीला आकर्षक चित्र लावणाऱ्यांविरोधात कारवाईची मोहिम हाती घेतली आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी ही कारवाई सुरु केली आहे. जिल्ह्यात 90 हून अधिक वाहतूक पोलीस तैनात असून गाडीवर बेकायदेशीर स्टीकर, लोगो दिसल्यास त्यांच्या माध्यमातून कारवाई सुरु केली आहे. आतापर्यंत 66 चालकांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये पोलीस, प्रेस,ॲडव्होकेट यांचा समावेश आहे. उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून मान्यता नसतादेखील गाडीवर स्टीकर, लोगो लावणाऱ्यांना दणका देण्यात आला आहे.
काही महाभाग पोलीस, पत्रकार, आमदार, वकील नसताना बिनधास्तपणे त्यांच्या वाहनांवर स्टीकर, लोगो लावून मिरवत असतात. पोलिसांच्या कारवाईपासून तसेच कोणीही रोखू नये म्हणून हा प्रकार केला जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र रायगडच्या जिल्हा वाहतूक शाखेने या प्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी मोहिमच हाती घेतली आहे. त्यांच्या या मोहिमेतून अनेक वाहन चालकांसह मालकांना शिस्त लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.







