। कोर्लई । प्रतिनिधी ।
मुरुड येथील परेशनाका-मच्छिमार्केट ते खोकरी रस्त्याचे काम लेखी आश्वासन देऊनही मुदतीत न करण्यात आल्याने याविरोधात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा व स्थगित केलेले उपोषण पुन्हा सुरु करणार असल्याचा इशारा पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी दिला असून, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता यांना याबाबतचे निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मुरुड तहसील कार्यालय परेश हॉटेल- मच्छिमार्केट ते खोकरी या खराब झालेल्या रस्त्याबाबत दि.17 फेब्रुवारी रोजी आपणास लेखी स्वरुपात कळवून मुरूड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलो असता, त्यादिवशी आपणाकडून 15 दिवसांची व दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी कार्यकारी अभियंता अलिबाग सा.बां. विभाग यांच्या कार्यालयाकडून या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू करण्याचे प्रयत्न करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. दरम्यान, दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दि.20 मार्च ते दि. 01 एप्रिलपर्यंत सदर रस्त्याचे काम न केल्याने संबंधित अधिकारी कोणत्याही प्रकाची कारवाई न करता ठेकेदाराला पाठीशी घालून स्थानिक जनतेची दिशाभूल करत असल्याचे दिसून येत आहे. तरी या रस्त्याचे काम दि.12 नोव्हेंबरपर्यंत ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकरी यांनी जातीने लक्ष घालून पूर्ण न केल्यास आगामी नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.






