| तळा | प्रतिनिधी |
तालुक्यातील बारपे येथे घरकुल मंजूर करून देतो असे सांगून महिलेचे दागिने घेऊन पसार झालेल्या आरोपीला तळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तळा तालुक्यातील मौजे बारपे येथे फिर्यादी उर्मिला नाडकर यांच्या घरी घरकुल मंजूर करून देतो, अशी बतावणी करून एका इसमाने त्यांच्याकडील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कुड्या गोड बोलून काढून घेतल्या व तुमचे घरकुल मंजूर झाले की, तुमचे दागिने परत देतो असे सांगून आपला मोबाईल क्रमांक देऊन निघून गेला. त्यानंतर उर्मिला नाडकर यांनी सदर मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो क्रमांक वारंवार बंद असल्याचे त्यांना समजताच आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती गावचे पोलीस कांतीलाल कसबले यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाणे येथे दिली असता तळा पोलिसांनी युद्धपातळीवर सापळा रचून सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील दागिने फिर्यादी यांना परत केले. आरोपीवर तळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बजावलेल्या या कामगिरीबद्दल बारपे ग्रामस्थ व पोलीस पाटील कांतीलाल कसबले यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी सपोनि सतीश गवई, उप पो. निरीक्षक विजय पाटील, अंमलदार विकास खैरनार यांसह तळा पोलीस कर्मचारी उपस्थित होते.






