खुद्द पनवेल मनपा आयुक्त गस्तीवर
। पनवेल । वार्ताहर ।
सरत्या वर्षाला राम राम ठोकत नववर्षाच्या स्वागतासाठी होणार्या कार्यक्रमांवर पनवेल महानगरपालिकेने करडी नजर ठेवली असून, ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या आरोग्यविषयक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर पालिकेच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे.
या कारवाईतील अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख हे स्वतः या कारवाईसाठी गस्तीत सामिल झाले होते. शिवाय या कारवाईत आयुक्तांसह उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, सहाय्यक आयुक्त वंदना गुळवेही यांनी सहभाग घेतला ऊसन, पालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल अशा चारही प्रभागात दंडात्मक कारवाई केली आहे.
राज्यासह पालिका क्षेत्रात कोराना रूग्ण संख्या वाढू लागल्याने शासनाने पुन्हा कठोर निर्बंध लागू गेले आहेत. नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांबरोबरच विना मास्क फिरणार्या आणि रात्री 9 नंतर जमावबंदीचे आदेशाचे उल्लंघन करणार्या नागरिकांवर, कोरोना नियमांचे उल्लंघन करणार्यां आस्थापनांवर कारवाई करण्यात येत आहे.
यानुसार पालिका क्षेत्रात ठरवून दिलेल्या आसनक्षमते पेक्षा जास्त गर्दी असलेल्या आस्थापना, ठरवून दिलेल्या वेळेनंतरही आस्थापना सुरू ठेवणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणार्या आणि मुखपट्टीचा वापर करीत नसलेल्या नागरिकांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
नववर्षानिमित्त हॉटेल,रेस्टॉरंटमध्ये आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमांमध्ये करोना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये 50 अधिकारी- कर्मचार्यांची भरारी पथके गेल्या दोन तीन दिवसापासून तैनात करण्यात आली. त्यांच्या माध्यमातून नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जात आहे. हुल्लडबाजी करणार्यांवर या पथकाची करडी नजर ठेवून होते. शहरातील मोकळ्या जागी तसेच सार्वजनिक ठिकाणीही या पथकांमार्फत कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर प्रमुख ठिकाणांसह बाजारपेठ परिसरात रात्री 9 वाजेनंतर गर्दी होणार नाही याची दक्षता पालिकेच्या भरारी पथकाने घेतली.
कारवाईत संकलित दंड रक्कम
- 29 डिसेंबर – 95 हजार रूपये
- 30 डिसेंबर – 1 लाख 87 हजार रूपये
- 31 डिसेंबर – 2 लाख52 हजार 700 रूपये