सात जणांविरोधात गुन्हा दाखल
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर पोलिसांनी मरीआई ग्रिट्स बारवर कारवाई करत सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यात चार महिला, एक मॅनेजर आणि दोन पुरुष वेटर यांचा समावेश आहे.
दि. 16 एप्रिल रोजी पनवेल ओएनजीसी जवळील मरीआई ग्रिट्स बारमध्ये महिला वेटर अश्लील हावभाव करत असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पनवेल पोलिसांनी त्या ठिकाणी धाड टाकली. यावेळी महिला वेटर या अश्लील हावभाव, भिभत्स वर्तन, अंगविक्षेप तसेच हातवारे करून नृत्य करून ग्राहकांसोबत अश्लील चाळे करत होत्या. यावेळी त्यांना पुरुष वेटर प्रोत्साहन देताना दिसून आले. या प्रकरणी पोलिसांनी बार मॅनेजर, महिला वेटर, पुरुष वेटर यांच्यावर 17 एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. तीन ते चार महिन्यातील या बारवर ही दुसरी कारवाई आहे. त्यामुळे या बारचा परवाना कायमचा रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील ग्रिट्स बार अँड रेस्टॉरंटवर डिसेंबर-जानेवारी महिन्यात गुन्हे शाखा कक्ष 1 वाशीने कारवाई करत तब्बल 51 जणांवर गुन्हा दाखल केला होता. पनवेलमध्ये सुरू असलेल्या लेडीज बारमध्ये काम करणार्या महिलांकडे नोकरनामे नसताना देखील महिला काम करत असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून बारची तपासणी होत असल्याचे वारंवार सांगण्यात येते. मात्र, असे जर होत असेल तर नोकरनामे नसताना देखील महिला कशा काय काम करू शकतात हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. अनेक बार मालकांनी हे बार भाड्याने दिलेले आहेत. बारमालक भाडे वसूल करण्यासाठी कोणत्याही थराला जात आहेत. बार मध्ये वेश्या व्यवसायाला प्रोत्साहन दिले जात आहे.
लेडीज सर्व्हिस बारमधून वेश्याव्यवसायास चालना मिळत आहे. पनवेल आणि नवी मुंबईत आजही लेडीज सर्व्हिस बारच्या नावावर चालणारे काही बार रात्री दीड ते दोन वाजता बंद होतात. लेडीज सर्व्हिस बारमधील वेटर्सला देण्यात येणारे नोकरनामे बहाल करण्याचा अधिकार उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. नोकरनाम्याच्या अधिक पटीने महिलांना कामावर ठेवले जात आहे. पोलिसांकडून अनेकदा डान्सबारवर कारवाई केली जाते. यात केवळ मॅनेजर व वेटरवर गुन्हे दाखल करून बार मालकांना पाठीशी घातले जाते. अनेक ठिकाणी बारमध्ये अल्पवयीन मुली देखील काम करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेलच्या सर्वच बारमध्ये अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केले जात आहे.