15 हायवा डंपर ताब्यात; वनविभागाची धडक कारवाई
| चिरनेर | प्रतिनिधी |
पर्यावरणाला हानीकारक ठरणारे मुंबईतील डेब्रिज बेकायदेशीररीत्या उरण येथील वनविभागाच्या जागेत टाकणारे 15 हायवा डंपर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी एकाच दिवशी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे अवैधरित्या डेब्रिज टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील मोठ्या प्रमाणावर डेब्रिज नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरातील जागा मिळेल त्या ठिकाणी टाकले जात आहे. या डेब्रिजमध्ये पर्यावरण व नागरिक, जैवविविधतेला घातक ठरणाऱ्या धोकादायक घटकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. त्यानंतरही विविध शासकीय विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नजरा चुकवून मोठ्या प्रमाणावर मुंबईतील डेब्रिज आणण्यात येते. मुंबईतून येणाऱ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या या बेकायदेशीर डेब्रिजमुळे मात्र नवी मुंबई , पनवेल, उरणमधील काही ठिकाणी डेब्रिजचे डोंगरच निर्माण झाले आहेत. यामुळे मात्र पर्यावरण व नागरिक, जैवविविधतेचीही मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे.
या गंभीर प्रकारामुळे पर्यावरण विभाग, नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात असतानाच मुंबईतील घातक डेब्रिज वनविभागाच्या जागेत बेकायदेशीर भराव टाकणारे 15 हायवा अवजड डंपर रविवारी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत ताब्यात घेतले आहेत. वनविभागाच्या गव्हाण सर्व्हे नंबर 351, 352 जागेत अवैधरित्या डेब्रिज टाकण्याचे काम सुरू असतानाच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडून 15 हायवा डंपर ताब्यात घेतले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या डंपर मालकांवर वन अधिनियमानुसार गुन्हे ही दाखल करण्यात आले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या 15 हायवा डंपरवर जप्तीच्या कारवाईसाठी प्रादेशिक व वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक व सहाय्यक वनसंरक्षक पनवेल न्यायालयात प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती उरण वनक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी यांनी दिली. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे मात्र बेकायदेशीर डेब्रिज टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.






