। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील समुद्रामध्ये खुलेआमपणे डिझेल तस्करी केली जात आहे. डिझेल तस्करीमुळे सागरी किनारे असुरक्षीत असून दहशवादी हल्लेखोरांना मोकळी वाट मिळत असल्याचा आरोप शिवराज्य ब्रिगेडचे जिल्हा प्रमुख आकाश राणे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले आहे.
आकाश राणे यांच्या तक्रारीनुसार, मुंबई, रायगड, नवी मुंबई या ठिकाणी असणार्या समुद्रकिनार्या लगत जहाजातून डिझेलची चोरी केली जाते. हा विषय गंभीर होत चालला आहे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा बंदरावर सीमा शुल्क विभागाने कारवाई करीत चार डिझेल टँकर व दोन मासेमारी बोटी जप्त केल्या. या कारवाईनंतर डिझेल तस्करांना दणका मिलाला आहे. रायगड ते मुंबई समद्रातून होणार्या डिझेल तस्करीबाबत पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. आर्थिक संगमताने कारवाईकडे दूर्लक्ष होत आहे. त्यामुळे सागरी सुरक्षा धोक्यात येऊन 26/11 सारख्या हल्ल्याची, घुसखोरीची शक्यता नाकारता येत नाही. डिझेल तस्करीमध्ये मुख्य सुत्रधार इस्तियाक शेख, राजू पंडित, लालाभाई यांचा सहभाग आहे. हा व्यवसाय करण्यासाठी राजकारणीदेखील सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. डिझेल तस्करी देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे.
शेखसह कुंदन म्हात्रे, समीर पारंगे, आणि प्रवीण आवटे हे माफिया सम्राट आहेत. शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या माध्यमातूनमोठ्या जहाजांमधून लहान बोटीमध्ये डिझेल टाकण्याचे काम केले जाते. कुंदन म्हात्रे हा बेलापूरचा आहे. सुरु असलेला अवैध धंद्याला आधार मिळावा, म्हणून स्थानिक पातळीवर विविध यंत्रणेला सांभाळण्याचे काम तो करतो. समीर पारंगे आणि प्रवीण हे दोघे टँकरवाल्यांना बोलावून त्यामध्ये डिझेल भरण्याचे काम करतात. डिझेल चोरीचा काळा बाजार या चौघांमार्फत चालविला जात आहे.
डिझेल तस्करीमुळे कोट्यावधींचे नुकसान होत आहे. सागरी सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे डिझेल माफियांविरोधात कारवाई करून त्यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आकाश राणे यांनी केली आहे.







