पनवेलमध्ये गुटखा विक्रेत्यांवर धडक कारवाई

सात टपऱ्या सील; 35 हजारांचा साठा जप्त

। पनवेल ग्रामीण । प्रतिनिधी ।

रायगड जिल्ह्यातील अन्न व औषधे प्रशासनाने प्रतिबंधित गुटखा विक्रीविरोधात मोठी कारवाई करत पनवेल परिसरातील कामोठे आणि आकुर्ली येथे एकाच दिवशी सात टपऱ्यांवर छापे टाकले. या कारवाईत एकूण 35 हजार 328 रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून संबंधित सर्व टपऱ्या सील करण्यात आल्या आहेत. या धडक कारवाईमुळे बेकायदा गुटखा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सहाय्यक आयुक्त नितीम मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रियंका भंडारकर आणि रोहित लोकरे यांनी ही संयुक्त कारवाई पार पाडली. कामोठे परिसरात चार पानटपऱ्यांवर छापे टाकण्यात आले. यात ललित सेवक दामरे (नॅनो पान शॉप), रवेंद्र धर्मसिंग (पान स्टॉल), मोहम्मद सद्दाम (अपना किराणा अँड जनरल स्टोअर) आणि जयरायन इंद्रजीत चौहान (पान स्टॉल) यांचा समावेश असून, येथून 16 हजार 219 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला. या सर्वांवर कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

दरम्यान, आकुर्ली गावातील रामेंद्र कुमार साहू, संजय राम औतार आणि दिनेश गुप्ता यांच्या तीन टपऱ्यांवरही छापे टाकण्यात आले. या ठिकाणांहून 19 हजार 109 रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला असून खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पनवेल परिसरात एकाच दिवशी सात टपऱ्यांवर झालेली ही पहिली मोठी कारवाई मानली जात आहे. मात्र, जिल्ह्यात मर्यादित अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात टपऱ्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असल्याने मनुष्यबळ वाढवण्याची गरजही व्यक्त होत आहे.

दरम्यान, बेकायदा गुटखा विक्री रोखण्यासाठी अशा टपऱ्या पूर्णपणे हटवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे. नागरिकांनीही प्रतिबंधित गुटखा विक्रीबाबत माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले असून तक्रारींसाठी टोलफ्री क्रमांक 1800 222 365 उपलब्ध आहे.

गेल्या आर्थिक वर्षातही प्रशासनाने 67 लाख 84 हजार रुपयांचा गुटखा साठा जप्त करण्यात आला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Exit mobile version