तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना पकडले रंगेहाथ
। महाड । प्रतिनिधी ।
मागील काही दिवसापूर्वी पोलादपूर तालुक्यातील तहसीलदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना ताजी असतानाच एका शेतकऱ्याला सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि. 04) महाड तालुक्यातील एका तलाठी व मंडळ अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाड तालुक्यातील वरंडोली येथील एका शेतकऱ्याने आपल्या खरेदी केलेल्या जागेची नोंद सातबारा उताऱ्यावर करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. ही नोंदणी करण्यासाठी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने तीन हजार रुपयांची मागणी केली असता, शेतकऱ्याने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
तक्रारीनुसार विभाग अधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि. 4) दुपारी महाड शहरात सापळा रचून तलाठी व मंडळ अधिकारी या दोघांनाही ही तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. सुरज मोहनलाल पुरोहित (35), तलाठी सजा नाते, अतिरिक्त कार्यभार तलाठी सजा चापगाव, रा. ॲप्पल प्लाझा, नवेनगर, महाड-रायगड आणि भगवान तेजराव मोरे (56), मंडळ अधिकारी, मंगरूळ, अतिरिक्त कार्यभार नाते, वरंडोली, राहणार बिरवाडी, तालुका महाड जिल्हा रायगड अशी या दोघांची नावे असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड विभाग पोलीस निरीक्षक संतोष भिसे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून अधिक तपास सुरू आहे.