सिडकोचा वसाहत अधिकारी अडचणीत

एक कोटी 94 लाख रुपयांच्या अपसंपदा प्रकरणी कारवाई
नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे छापे

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

सिडकोच्या काही लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात लाच घेतल्याप्रकरणी कारवाई होत असताना आता अपसंपदा प्रकरणी सिडकोचे वसाहत अधिकारी सागर तापडिया मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांनी एक कोटी 94 लाख 47 हजार 905 रुपयांची अपसंपदा संपादित केल्याचे निष्पन्न होत असून त्याची उत्पन्नाची टक्केवारी 173.36 टक्के असल्याचे कारवाईतून स्पष्ट झाले आहे. नवी मुंबईच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

सागर मदनलालजी तापडीया असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. पनवेल येथील सिडकोड नोडल कार्यालयात प्रभारी सहाय्यक वसाहत अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते सेवेतून बडतर्फ झाले आहेत. नवी मुंबईचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सागर तापडिया व त्यांच्या कुटूंंबियांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात आली. मालमत्तेच्या उघड चौकशीमध्ये आरोपी सागर तापडिया यांना एक कोटी 12 लाख 17 हजार 140 रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. तापडिया यांनी त्यांचे व त्यांची पत्नी मनीषा तापडिया यांची नावे परीक्षण कालावधीमध्ये एकूण एक कोटी 42 लाख 17 हजार 140 रुपयांची मालमत्ता संपादित केली. तसेच, एक कोटी 64 लाख 48 हजार 520 रुपयांचा खर्च केला. तापडिया यांना परीक्षण कालावधीमध्ये मिळालेल्य उत्पन्नामधून त्यांनी संपादित केलेली मालमत्ता व खर्च असे एकूण वजा केले असता, तापडिया यांनी एक कोटी 94 लाख 47 हजार 905 रुपायंची अपसंपदा जमा केली असल्याचे निष्पन्न झाले. या अपसंपदापैकी काही मालमत्ता तापडीया यांनी त्यांची पत्नी मनीषा सागर तापडिया यांच्या नावे आहे. मनिषा तापडीया यांनी सागर तापडीया यांना बेकायदेशीर अपसंपदा मिळविण्यासाठी प्रोत्साहन दिले. सागर तापडिया व त्यांची पत्नी मनिषा तापडीया यांनी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 संशोधन 2018 चे कलम 13 (1)(ब), 13(2), 12 प्रमाणे गुन्हा केल्याचे उघड चौकशीमध्ये निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांनी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके करीत आहेत.

Exit mobile version