करंजाडे ग्रामपंचायतीतर्फे कारवाईचा बडगा

आरोग्यविषयक निर्बंधांचे उल्लंघन पडणार महागात
। पनवेल । प्रतिनिधी ।

कोरोनाविषयक लागू करण्यात आलेल्या आरोग्यविषयक निर्बंधांचे उल्लंघन महागात पडणार आहे. कारण करंजाडे परिसरात कोरोनाविषयी नियमांची पायमल्ली केल्यास याविरुद्ध ग्रामपंचातीतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यात दिवसागणिक कोरोनाचा कहर वाढत आहे. कोरोना आणि त्याचे नवनवीन व्हेरीएंट जनतेची चिंता वाढवित आहेत. त्यामुळे कोरोनाचा सामना करण्यासाठी आता शासन तथा प्रशासन आपापल्यापरीने सज्ज झाले आहे.
याच दृष्टीने करंजाडे ग्रामपंचायत सज्ज झाले आहे. पनवेलचे तहसीलदार विजय तळेकर व पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या निर्देशानुसार मंडळ अधिकारी, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी, करंजाडे पोलीस पाटील कुणाल लोंढे यांच्याकडून करंजाडे वसाहतीमध्ये विना मास्क फिरणार्‍या व आस्थापनांमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितपणे आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
मध्यंतरी कोरोना आटोक्यात आल्यामुळे आणि दिवसागणिक आरोग्ययंत्रणातील सुधारणांमुळे नागरिक निर्ढावले आहेत. यामुळे आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली नागरिकांकडून होवू लागली. आणि परिणामी कोरानाचा संसर्ग वाढला आहे. यामुळे आता सर्व नागरिकांनी आरोग्यविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पनवेल प्रशानाकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version