| पनवेल | वार्ताहर |
खाडीवर उभारल्या जाणाऱ्या 1.1 किलोमीटर लांबीच्या पूल उभारणीच्या कामाला पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून परवानगी मिळताच बांधकाम कंपनीने प्रत्यक्ष कामाला केली आहे. येत्या 18 महिन्यात खारघर-तळोजा खाडीपुलाचे काम पूर्ण केले जाणार असल्यामुळे तळोजा आणि खारघर मधील नागरिकांचा प्रवास लवकरच सुखकर होण्याची चिन्हे दिसत आहेत.
खारघर वसाहती नंतर सिडको तर्फे तळोजा वसाहत उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. तळोजा वसाहतीच्या वाढत्या विकासामुळे नागरिकांनी या ठिकाणी घरे घेवून वास्तव्याला सुरुवात केली. तळोजा वसाहतीमधील वाढत्या लोकसंख्येमुळे सिडकोने तळोजा वसाहत फेज -1 या ठिकाणी रेल्वे रुळाखाली भुयारी मार्ग उभारला. याशिवाय तळोजा फेज-2 येथील पेंधर पुलाकडे लक्ष केंद्रित करुन अनेक वर्षे खितपत पडलेल्या पेंधर पूल बांधकामाला गती देऊन रेल्वे विभागाकडून परवानगी घेवून रेल्वे लाईनवर ग्रेडर टावून पूल उभारणीच्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसात सिडकोने तळोजा वसाहत थेट खारघर वसाहतीला जोडणाऱ्या 96 कोटी रुपये खर्चाच्या तळोजा खाडी पूल उभारणीला मंजुरी दिली. येत्या 18 महिन्यात खारघर-तळोजा खाडी पुलाचे बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. सिडको तर्फे तळोजामध्ये मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभारणीचे काम सुरु आहे.
तळोजा-खारघर जोडणाऱ्या पेंधर आणि तळोजा खाडीपुलाच्या कामाला सुरुवात झाली आहे. सिडकोकडून नवीन वर्षात तुर्भे-खारघर लिंक रोड बांधण्याचे काम सुरु होणार आहे. मुंबई, नवी मुंबई मार्गे तुर्भे-खारघर लिंक रोड खारघर मधील सेंट्रल पार्क लगत असलेल्या 30 मिटर रुंदीच्या रस्त्यामध्ये विलीन होणार आहे. नवी मुंबई मेट्रो तसेच तळोजा-खारघर खाडीवरील उषण पूल, तुर्भे-खारघर लिंक रोड आणि सीबीडी-खारघर कोस्टल रोड या रस्ते वाहतूक सुविधांमुळे तळोजा वसाहतीत विना अडथळा जाता येणार आहे.