| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल प्रभाग समिती ‘ड’ मार्फत मंगळवारी (दि.28) मोठी अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली. या कारवाईत नवीन पनवेलमधील गणेश मार्केटच्या बाजुची, सेक्टर 3 मनसे रोड येथील आणि सेक्टर 13 अंबराई गार्डनच्या बाजुला असणाऱ्या चिकन, मटणाच्या दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली. पनवेल पालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनूसार ही कारवाई पार पडली.
पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागांमध्ये चिकन व मटणाच्या दुकानांनी अतिक्रमण केले होते. तसेच, विमानतळाच्या परिसरात चिकन मटणाच्या दुकानांना अधिकृत परवानगी दिली जात नाही. कारण या दुकानांतील शिल्लक मांस इतरत्र टाकले जाते. त्यामुळे ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षी त्या ठिकाणी येतात. त्याचा परिणाम विमानतळावरून उडणाऱ्या विमानांवर होतो. नवी पनवेलच्या जवळच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. त्यामुळे नवीन पनवेलमधील गणेश मार्केटच्या बाजुची, सेक्टर 3 मनसे रोड येथील आणि सेक्टर 13 अंबराई गार्डनच्या बाजुला असणाऱ्या चिकन, मटणाच्या दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली. या अतिक्रमण विरोधात कारवाई करण्याच्या सूचना उपायुक्त नानासाहेब कामठे यांनी दिल्या आहेत. त्यानूसार चारही प्रभागात अतिक्रमण विरोधी मोठ्या कारवाया सुरू आहेत.ही कारवाई सहाय्यक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी रूपाली माने, प्रभारी प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे तसेच अतिक्रमण कर्मचारी व रायगड सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत करण्यात आली. अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवरती महापालिकेने तोडक कारवाईचा बडगा उचलला असून यापुढेही अनधिकृत व्यवसाय धारकांवर अशाच प्रकारची कारवाई पुढेही सुरू राहील, असे महापालिकेतर्फे सूचित करण्यात आले आहे.





